Pages

Powered By Blogger

Monday, August 12, 2013

Chennai Expressam !!!


ऎकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीचा विसर पडून इतरांचे रिव्ह्यू ऎकून ’चेन्नई एक्सप्रेस’ पहायला गेलो. त्यामुळे मागच्यास ठेच आणि पुढचा शहाणा या पंक्तीला जागून एक सामाजीक जबाबदारी म्हणून आणि आपल्या ’दुनियादारी’ला दिलेल्या त्रासाच्या निषेधार्थ हा लेख लिहीतो आहे.

प्राथमिक अटी - चित्रपट पूर्ण पाहून तो कळण्यासाठी प्रेक्षकांनी तमीळ भाषेचा प्राथमिक कोर्स करावा. चित्रपट विनोदी आहे आणि तो न कळाल्यास प्याव आणि पिव अशा खास संगीताची जागोजागी पेरणी आहे. चाणाक्ष प्रेक्षकाला कुठे हसायचे आणि रडायचे हे कळवण्याची जबाबदारी रोहीत शेट्टीने घेतली आहे.

चित्रपटाची सुरुवात चाळीस वर्षीय राहुलबाबाच्या कंटाळवाण्या स्वगताने होते. आपल्या आज्जी आजोबां बरोबर राहणारा हा राहूल आपल्या वडलोपार्जीत बिझनेसमध्ये फ़ारसा खुश नसतो. दरम्यान त्याचे दोन मित्र बॉंम्बे टू गोव्याचा प्लॅन करत असतनाच, अचानक आजोबांचे निधन होते. राहूल आपले ‘कुछ और करनेके सपने’ आपल्या आज्जीला (कामिनी कौशल) सांगतो. आज्जीही त्याला आगेकुच करायला लगेच मान्यता देते पण एका अटीवर. ती म्हणजे आजोबांच्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करण्याची. राहुलने आजपर्यंत बाहेरची दुनीया बघितली नसल्याने, तो आणि त्याचे मित्र लगेच गोव्याला प्रायोरिटी देत तिकडेच अस्थींविसर्जन करायचे ठरवितात.

‘गोआ इज ऑन’ हे ब्रिदवाक्य म्हणत आज्जीला चकवण्यासाठी सफ़ेद झुठ बोलत राहुल चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसतो. तिथे त्याची भेट मीना बरोबर दिलवाले स्टाईलमध्ये होते. इतका वेळ असह्य होणारा चित्रपट दीपिकाच्या सुमूख दर्शनाने पहिल्यांदाच सुसह्य वाटायला लागतो. पण मीना बरोबर तिचे चार सांड भाऊसुध्धा गाडीत रिपीट स्टाईलमध्ये पाठ्लाग करत येतात. (हे डोक्यात जाते). ‘शौचालय’छाप प्रचंड विनोदी(!) गाण्यांच्या भेंड्या म्हणत आणि नोकीआ लुमीया ९२० ची किंमतीसह जहिरात करत करत, चेन्नई एक्सप्रेस विनोदी ट्रॅकवर सुसाट सुटते.

धावत धावत हि एक्सप्रेस मीनाच्या गावी पोहोचते. मीनाचे वडील (सत्यराज) डॉन असतात. त्यांच्या तावडीतून स्वत:ची आणि राहुलची सुटका करण्यासाठी मीना एकामागून एक खोटं बोलत जाते. दरम्यान गाणी गात, दारू पिउन अचाट साहसी प्रकार करत प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे केवीलवाणे बालीश प्रयत्न राहुल करत राहतो. पुढे चालू राहणारा सावळा गोंधळ प्रेक्षक सहन करत राहतो.

पुढे रोहीत शेट्टी स्टाईलमध्ये अनेक गाडयांचा चक्काचुर करत कहाणी प्रेमामध्ये रुपांतरीत होते. शुईक,शुईक करत रजनीकांत फ़ेम अतिशयोक्ती ऍक्शन सीन्सचा भडीमार करत, अपेक्षीत वळणावर घसरत घसरत चेन्नई एक्सप्रेस एकदाची रुळावर थांबते.इती स्टोरी.

‘डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन’ अशा निरर्थक वाक्यांचा अतीवापर करुन सर्वसामान्य प्रेक्षकांना दिग्दर्शकाने अंडरएस्टिमेट केले आहे. बरेचसे ‘बोकवास’ विनोदी पंच प्रेक्षकांच्या डोक्यावर मारुन झिणझिण्या आणल्या आहेत. किरकोळ प्रसंगामध्ये चेहर्‍यावर स्मितहास्य उमट्ण्याची शकयता आहे. पण तेवढ्यापुरतेच.

दीपिका सुरुवातीच्या दिलवालेच्या सिनपासून शेवटपर्यंत अतीशय सुंदर दिसते. ती अनूक्रमे हिरव्या,नारिंगी,राणी,पिवळ्या,पांढऱ्या,गुलाबी,आकाशी,जर्द निळ्या अशा कांजीवरम साडयांमध्ये अतीशय कातील दिसली आहे. साड्यांचा क्रम लक्षात राहीला यातच सारेकाही आले. तिची नारळी उंची आणि गालावरची खळीरुपी कळी ठिकठिकाणी खुलून आली आहे. शाहरुख तिच्यापुढे सगळ्याच बाबतीत खुजा वाटतो. पांढर्‍या साडीमध्ये गजरा घालून कमनीय बांधा पाहताना, ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला असे होते. ‘बनके तितली दिल ऊडा ऊडा’ करत लगेच आपलेही दिल उडत उडत दूर जाते. शेवटी मिनीजपेक्षा तिनेही विद्याप्रमाणे साड्यातच रहावे असा प्रेमळ सल्लाही मनातल्या मनात आपण देतॊ. आवरा ! हात लिहीता,लिहीता जास्ती घसरत चालला आहे.

‘ई’च्या भाषेत हेल काढून बोलण्याचा दीपिकाने चांगला प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न तमीळपेक्षा मल्याळम भाषेशी जास्ती साधर्म्य राखतो. हि चूक दिग्दर्शकाची. सॉफ़्ट कॉर्नर असल्या कारणाने दीपिकाला नावे ठेवण्यात फारसा पॉईंट नाही.

सत्यराज ठिक आणि तंगबलीची (निकीतीन धीर) भूमिका तब्येतीला अनूसुरुन.

चित्रपटाचे संगीत ही जमेची बाजू आहे. विशाल-शेखरने सर्वच गाणी श्रवणीय केली आहेत. वन,टू,थ्री,फ़ोर आणि लुंगी डान्स हि गाणी टिपीकल साऊथ ईंडीयन स्टाईलमध्ये झाली आहेत.

गणेश भक्तांची येत्या सिझनला या गाण्यांमुळे शोल्डर आणि बॉडी‘हिचीक मिचिक’ करायची नाचो सोय झाली आहे.

एस.पी. च्या पुनरागमनाबद्दल जोडीचे धन्यवाद.




सिनेमॅटोग्राफी विशेष नमूद करण्याची गोष्ट. सर्व लोकेशन्स सुंदर. दुधसागर धबधब्याचे विहंगम द्रुष्य मजा आणते. ‘कश्मिर मैं, तू कन्याकुमारी’ गाण्याचे चित्रीकरणही सुखद.

लुंगी डांस वाले रजनीकांत ट्रिब्युट सॉंग प्रेक्षाग्रुहातून बाहेर पडत असताना, थोडे पैसे वसूल झाल्याची भावना वाढवते. नकळत आपणही शिट्ट्या मारतो.





डोके बाजूला ठेऊन,शाहरुखकडून अपेक्षा न ठेवता चित्रपट बघीतला तरीही ते दुखते, चिडचिड होते. दीपू आणि गाण्यांसाठी डक्काव डक्काव एक्सप्रेसमध्ये एकदा बसू शकता. छ्ल्लो... कू~...~ क !!!

ता.क. : घरगुती रिव्ह्यू असल्याने शाब्दिक अलंकार शोधायला जाऊ नये. सापडणार नाहीत. चित्रपटाला जायच्या आधी रिव्ह्यू वाचा आणि तरीही पहायला गेलाच तर नंतर पुन्हा वाचून अभिप्राय कळवा.
 आपला नितीन ....!

No comments:

Post a Comment