Pages

Saturday, August 17, 2013

Once Upon Ay Time In Mumbai Dobaara !खास लोकाग्रहास्तव दुसरा रिव्ह्यू . लोकाग्रहास्तव म्हटले कि उगीचच वजन वाढते.

मुंबई आणि संघटित गुन्हेगारी या विषयावर आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट येऊन गेले. ‘सलाम बॉम्बे’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘वास्तव’, ‘ब्लॅक फ्रायडे’ या सर्वांनी एक वेगळी उंची गाठली आहे.

पण या परंपरेला तडा देत ‘वन्स अपऑन अ टाईम दोबारा’ चालू होतो आणि प्रेक्षक थिअटरमधून कधी एकदा पोबारा करता येईल याची वाट पहात राहतो.

कथासार -कोणे एके काळी (वन्स अपऑन अ टाईम), मुंबई नावाच्या आटपाट नगरात हि कथा घडते.

चित्रपटाची सुरूवात दोन मुलांच्या रेसने चालू होते. त्यानंतर शोएब (अक्षयकुमार) त्यांना लंबे रेस के घोडे म्हणून जॉब देतो. टुरटूर रेस हा सिलेक्शन क्रायटेरिआ! हि मुले पुढे जाऊन खर्‍या अर्थाने घोडे अस्लम (इम्रान खान) आणि देढटांग (पितोभाष त्रिपाठी) होतात आणि उधळतात.

शोएबला संपूर्ण मुंबईवर एकछत्री राज्य करायचे असते. सुल्तानने (जुना अजय देवगण) केलेली वाटणी त्याला अमान्य असते. आपल्या सर्व जानी दुष्मनांना तसे तो धमकीवजा सुनावतोही. रावल (महेश मांजरेकर) मात्र बगावत करतो आणि बॉम्बस्फोट करवून त्याला मारायचा प्रयत्न करतो. पण बॉम्बमुळे चालू गाडीमध्ये घड्याळाचे आणि स्पिडोमिटरचे काटे अचानक हलायला लागतात आंणि काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्यामुळे शोएब गाडीतून उडी मारून सहीसलामत सुटतो. हा प्रसंग अत्यंत विनोदी झाला असून, तुमच्या नशिबात असेल तरच तो पहायला मिळू शकतो. पेटलेला शोएब, रावलचा बदला घेण्यासाठी मिडल ईस्ट मधून मुंबईमध्ये एन्ट्री करतॊ. ’तुम अभिभी नही बदले’ असे लाडीक स्वागत त्याची जुनी लाडकी मैत्रीण मुमताझ (सोनाली बेंद्रे) करते. नशीब असते एकेकाचे. वर दाउद म्हटल्यावर विचारायला नको. असो.

इकडे मिसरूड फ़ुटलेला अस्लम आपल्या दादागिरीके कारनामे रेल्वे रुळांवरुन उड्या मारत मारत अंजाम देत असतॊ. शोएब म्हणजे त्याचा देव असतो. शोएबने केलेल्या उपकारांचे पांग फेडण्याचा वक्त आलेला असतो. सुतावरून स्वर्ग गाठत अस्लम रावलचा माग काढतो पण काटा काढ्ण्यात असफ़ल होतो. रावल बचावतो.

अचानक काश्मीरमधून जस्मिन मिर्झा (सोनाक्षी सिन्हा) मुंबई शहरमे नयी म्हणून अवतरते आणि डायरेक्ट समुंदरकिनारे शोएबलाच भिडते. काही आगा न पिछा. 


फ़ारसा वेळ न दवडता लगेच 'तैयबअली प्यार का दुश्मन हाय हाय' या एकाच गाण्यात अस्लमलाही नजरोके तीरसे घायाळ करते. अस्लमपण लगेच आरशात उतरतो आणि तिला इंग्रजी शिकवायला लागतॊ. काही अर्थ आहे काय (!). यातून पुढे विनोदनिर्मीती होते. या विनोदनिर्मीतीसाठी लेखकाला बेदम चोपच दिला पाहीजे.

पुढे दोन्ही ’दगडांवर’ पाय ठेवत ठेवत जस्मिनची वाटचाल चालू राहते. शोएब एफेक्टमुळे ती चित्रपटात काम करायला चालू करते. एक फ़ूल दो माली चा हा प्रेमाचा काटकोन त्रिकोण गटांगळ्या खात खात पुढे सरकतो. शेवटी कथा पूर्णत्वाला जाऊन कसाबसा पडदा पडतो.

अभिनय - अक्षयकुमार संपूर्ण चित्रपटभर एकाच सुरात फक्त पल्लेदार संवाद फेकत राहतो. सोनाक्षी सिन्हाचा वावर सहज पण अंगकाठीइतके फारसे भरभरून लिहीण्यासारखे काही नाही. चित्रपट दाऊद इब्राहिमच्या रिअल लाईफ स्टोरीवर असावा. पण अक्षयकुमार, दाऊद इब्राहिम फेम गॅंगस्टर नक्कीच वाटत नाही आणि सोनाक्षीनेदेखील मंदाकिनी सारखे काहीही केलेले नाही. आता काहीही म्हणजे नेमके काय असे खोचक प्रश्न नको आहेत. इम्रान खान अजूनही अभिनयाच्या प्रांतात नवखाच वाटतॊ. सोनाली बेंद्रेचे चित्रपटातले प्रयोजन कळत नाही. महेश मांजरेकरची भुमिका छोटी असल्याने त्याला फ़ारसा भाव खायला वाव नाही. पितोभाष त्रिपाठी बळेच आहे. तो रिकाम्या जागा भरतो

चित्रीकरण - ओमानमधील काही सिन्सचे चित्रीकरण अप्रतीम.  मुंबईपण छान.

संगीत - प्रितमने संगीतामध्ये पूर्ण निराशा केली आहे. लिहीणार्‍याणे गाणी लिहिली आहेत, गाणार्‍यांनी ती आपल्या परीने गायली आहेत. वाजवणार्‍यांनी जमेल तसे, जमेल तिथे, जमेल त्या सुरात वाजवले आहे.लेखन -  सगळ्यात जास्ती बाजी मारली आहे ती म्हणजे लेखक महाशय़ांनी. रजत अरोराचे चित्रपटातील प्रत्येक वाक्य दुसर्‍या वाक्याशी स्पर्धा करते. मसालेदार वाक्य घुसविण्याच्या नादात, भातात मसाला आहे कि मसाल्यात भात आहे हेच कळत नाही. शेवटी अक्षयकुमारचे एकसुरी डायलॉग अजिर्ण होतात.

दिग्दर्शन - ‘वन्स अपॉन १' आणि ‘डर्टी पिक्‍चर'चे दिग्दर्शक मिलन लुथरिया हेच का असा प्रश्न पडतो. चित्रपट सिरीअस, विनोदी कि हाणामारीचा करायचा आहे हे लक्षात न आल्याने सगळीकडेच गोंधळ उडालेला दिसतो. मागच्या ‘वन्स अपॉन १’मध्ये त्याने सुल्तान (हाजी मस्तान) आणि शोएब(दाऊदला) जिवंत केला होता.इथे मात्र गुन्हेगारी विश्व मागे राहून जास्मीन तुला कि मला असा कलगीतुराच फक्त रंगवण्याचा असफल प्रयत्न झाला आहे.

एकताला निरॊप : टायटल काय ठेवायचे यावर खलबत करत बसण्यापेक्षा, स्टोरीलाईनवर काम केले असते तर बरे झाले असते. Once Upon Ay Time Dobaara यामध्ये A नंतर y टाकणे, तीन वेळा टायटल बदलणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. 

रेको : थोडक्यात चित्रपट पहायला जाऊ का असे ‘दोबारा मत पुछना’. श्रम, पैसे आणि वेळ वाया घालवू नका.

 ----------------------------------------------------------------------------------------------------

आता झाडाला लागणार्‍या पाच सहाशे रुपयांचे काय करायचे असा ज्यांना प्रश्न पडला असेल अशा पैसे वर आलेल्यांसाठी खालील प्रयोग.

पहिले साधारण अडीचशे तिनशे रुपये - बुड वर आलेली दुचाकी उचला. बायकोला घेऊन बालगंधर्वच्या कॉर्नरला दोन सुवासीक मोगर्‍याचे, अबोलीचे गजरे घ्या. तुमच्या हाताने झाशीच्या राणीच्या केसांमध्ये हलकेच माळा. संध्याकाळी बालगंधर्वला मस्तपैकी नाटकाचा प्रयोग पहा. माहीत नसेल तर ’येरे येरे पैसा’ नवीन नाटक अवश्य पहा. नाटक संपल्यावर हातात हात घालून वैशाली पर्यंत चालत जा. दोघात एक मसाला डोसा आणि एस.पी.डी.पी. ऑर्डर करा. आवडीने एकमेकांना खायला घाला. पुढे शौकिन मध्ये तांबूलग्रहण करुन निवांत घरी जा.

उरलेल्या अडीचशे तिनशे रुपयांचे काय?- हाच प्रयोग आपल्या आवडत्या  जुन्या किंवा नवीन मुमताझला बरोबर घेऊन पुन्हा एकदा करा. लग्न झाले नसेल तर पहिल्यांदा  आवडत्या मुमताझला आंणि दुसर्‍यांदा जास्मीनला घेऊन करा. या ‘दोबारा’ प्रयोगाचे पैसे मात्र शंभर टक्के वसूल होणार याची खात्री असावी.

आपला नितीन पवार

ता.क. : Suggestions are most welcome. The best suggestion will be given a book of all of my writings with my own signature.


No comments:

Post a Comment